Tuesday, 6 June 2023

शुभेच्छापत्र! 

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझा प्रिय मित्र पत्रकार महेंद्र मातोंडकर मला लिहिलेले शुभेच्छा पत्र!

निलू फक्त तुझ्यासाठी....!

नेहमीच हसतमुख उत्साही आणि तुझ्यासारखा आनंदी चेहरा समाजात अपवादानेच बघायला मिळतो... कधी कधी प्रश्न पडतो कि हा हा निलू एवढा कसा काय प्रसन्न दिसतो... याला नसतील का कसली टेन्शन, याच्या समोर नसतील का अडचणींचे डोंगर, याच्या मागे नाही लागत नसेल का संकटांची मालिका... असं कस यार हा पण माणूसच आहे. सुख थोडं दुःख फार ही तर मानवी जन्माची कहाणी आहे....! नाही हा माणूस दिसतो तेवढा सरळ नाही... स्वतःचे कष्ट, स्वतःतील नैराश्य, आणि स्वतःचे दुःख लपवून ठेवत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य खुलवण्याची दैवी शक्ती माझ्या या उत्सवमूर्ती मित्रांत आहे. म्हणूनच मित्रांची मांदियाळी नेहमीच त्याच्या अवतीभवती बघायला मिळते.... कडवटपणा पचवून गोड दिसण्याचं तुझं कसब मित्रा खरोखरच अलौकिक आहे.

     खरं तर तुझी माझी मैत्री जीवस्य कण्ठस्य वैगरे अजिबात नाही... कधीतरीच आपली भेट होते... पण या प्रत्येक भेटीत तुझी माझी चर्चा ही जास्तकरून वेंगुर्ला आणि वेंगुर्ल्यासाठी काय काय करता येईल यावरच होते... मी त्यानंतर चार्ज होतो. कल्पनांचे इमले बांधायलाही घेतो, पण खरं सांगू मित्रा मी फक्त कल्पनाच रंगवत राहतो आणि तुझी तळमळ वेंगुर्ल्याचे नाव झळकत राहण्यासाठी आकार घेत राहते... माझा वेंगुर्ला हा तर खरे म्हणजे तू सुरु केलेला एक साधारणसा व्हाट्सअप ग्रुप... पण तुझ्या तळमळीचा परिणाम म्हणून आज वेंगुर्लावासीयांचं हक्काचं व्यासपीठ, अस्मितेचं अधीष्ठान म्हणून या ग्रुपचं नाव प्रत्येक वेंगुर्लेवासीयांच्या मनावर अधिराज्य गाजवतय... अर्थात हे तुझं एकट्याच यश असं म्हणायचं धाडस मी करणार नाही. माझा वेंगुर्ला हे आता एक प्रभावी संगठन बनलंय... या ग्रुपशी जोडले गेलेले सर्व मित्र दिलदार आहेत, मेहनती आहेत, जिद्दी आहेत आणि महत्वाचं म्हणजे अत्यन्त प्रामाणिक आहेत... आणि म्हणूनच मित्रा मला तुझं खूप कौतुक वाटतं... कधीकधी तुझा हेवा पण वाटतो... तू हे आपापल्या क्षेत्रातले एवढे मतबगार मित्र कसे काय एकत्र आणू शकलास? हा प्रश्न तर बऱ्याचदा मला सतावतो... नाहीतर संगठन तर खुपजण चालवतात. माझीही होती युवा प्रतिष्ठान नावाची एक संस्था...! आज सगळं काही शांत आहे. शांत नाही आहेस तो तू.... तुझी धडपड सतत चालू आहे आणि ती अनेकांना पुढे चालण्यासाठी प्रेरणा देत आहे. मी देव मानणारा माणूस नाही पण तुझ्यासारखे मित्र बघितले कि कुठेतरी देव असल्याची जाणीव होते. तुझ्यासारख्या मनस्वी मित्रांच्या रूपात तो मला जाणवत राहतो...! तुझ्यावर आज हा लेख लिहावा असं काही मुद्दाम प्रयोजन नाही... फेसबुकला तुझा आज हा हसतमुख फोटो पाहिला. तुझा वाढदिवस आहे आज. तू वेंगुर्लेकरांचा लाडका आहेस... शुभेच्छांचा वर्षाव होतोय तुझ्यावर... मलाही त्या द्याव्याश्या  वाटल्या एव्हढच....!

      खरं तर तुझ्या व्यक्तिमत्वाचा खुपसा प्रभाव माझ्यावर आहे. मी मोकळेपणाने हे मान्यही करतो... कारण तू काय आहेस यार... तू उत्तम चित्रकार आहेस, उत्कृष्ट मूर्तिकार आहेस, कलात्मक फोटोग्राफर आहेस, मनस्वी लवचिक कलाकार आहेस, तू परफेक्ट पार्श्वसंगीतकार आहेस, तुला इंग्रजीचीही उत्तम जाण आहे, तूझी वाणी किती मधुर आणि आश्वासक आहे, तू दिसायलाही  नेहमीच टकटक आणि रुबाबदार आहेस. खरंच तुझ्यासारखं मलाही व्हायचं असतं यासाठीच माझ्यातील कलाकार जिवन्त करण्याचा प्रयत्न करत असतो, रंगांशी सलगी वाढवण्याचा प्रयन्त करत राहतो, मातीला पण आकार देण्यासाठी धडपडत असतो. तुझ्यासारखं कलासक्त व्हायला मला आवडतं म्हणून तुझ्या नकळत मी तुला खूपदा फॉलो करत असतो....!

   तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा... तुझ्या सगळ्या आशा आकांशा पूर्ण होवोत. तू उचललेले माझा वेंगुर्ल्याचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद कायम प्रबळ  राहो, तुझी वेंगुर्ल्याप्रती असलेली तळमळ फळास येवो, 22 आणि 23 तारिखला होणारा माझा वेंगुर्ल्याचा पतंग महोत्सव महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट महोत्सव ठरो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.... तुझ्याबद्दल खूप लिहावंसं वाटतय पण आता थांबतो....! देव बरे करो....!

 

              तुझाच एक साधासा मित्र...

                महेंद्र मातोंडकर

No comments:

Post a Comment