आठवून गेली एक पहाट, धुरकट धूक्यात उगवलेली।
पायाखालची हिरवी चार, ओल्या दवात थबथबलेली।।
आठवून गेला एक प्राजक्त, कुंपणातला बहरलेला।
पानांच्या गर्दीत फांदी-फांदीवरती, शुभ्र फुलांनी थरथरलेला।।
आठवून गेली ती सळसळ, मंद सुगंधी दरवळलेली।
नाजुक फुलांची नाजुक झेप, ओल्या तृणांनी झेललेली।।
आठवून गेला तो सडा, पांढर्या फुलांचा मोहरलेला।
हिरव्या रेशमी गालिच्यावर, ढीग मोत्यांचा पसरलेला।।
आजही ती पहाट येते, प्राजक्ताकडे पाऊल वळते।
समोर अस्थिपंजर तनूच दिसते, निराशेने मजसी हसते।।
आता कधी ते बहरणार नसते,
मी मात्र त्याची वाट पहात बसते।।
No comments:
Post a Comment